logo

खरीप पूर्व कडाक्याच्या उन्हातही शेतकरी वर्ग मशागतीच्या कामांना गती देताना,

*कडाक्याच्या उन्हातही खरिपपूर्व मशागतीच्या कामांना गती.*

*जगाच्या पोशिंद्याला दुनियेची काळजी*

*पैशाच्या जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची कसोटी.*

रिसोड : मध्यंतरी पडलेला अवकाळी पाऊस मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांसाठी
सोईचा ठरला आहे. परिणामी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही खरिपपूर्व कामांना वेग आला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या पैशासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असली तरी पुढील हंगाम चांगला होईल या आशेवर बळीराजा जोमाने कामाला लागला आहे.
सन २०२२-२३ चा खरिप हंगाम आणि २०२३-२४ चा रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचा गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक अवसान गळून पडले आहे. त्यातच सोयाबीनला मिळत असलेल्या मातीमोल भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी शेतकरी कमालीचे आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु आज नाही, तर उद्या धरणीमाय भरभरून देईलच या परंपरागत चालत आलेल्या आशेवर बळीराजा तग धरून उभा आहे. मात्र नैसर्गिक संकटांना कधीच न जुमानणारा बळीराजा सद्य स्थितीत आर्थिक संकटामुळे हतबल झाला आहे. कारण खरिप, रब्बी हंगाम तर हातचे गेलेच पण, थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगाम सुद्धा गारपिटीने भुईसपाट केला आहे. अशा बिकट परिस्थितीत असतांनाही जगाचा पोशिंदा सर्व दुःख विसरून दुनियेचं पोट भरण्यासाठी कडाक्याच्या उन्हातही जोमाने कामाला लागला आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मशागतीची कामे सोपी झाली असली तरी उष्णतेचा उकाडा मात्र भयंकर वाढला आहे. त्यातच मे महिन्यात उन्हाचा कडाका अधिकच तीव्र होत असतो हे सर्वश्रुत आहेच. तरीदेखील मागची कसर पुढे भरून निघेल या आशेवर शेतकरी खरिपपूर्व मशागतीसाठी जोमाने कामाला लागले आहेत. मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे नांगरून टाकलेल्या जमिनीतील मातीची ढेकळ मुरून जमीन नरम झाली आहे. त्यामुळे बैलावर वखरणी करण्याच्या कामाला वेग आला आहे. तद्वतच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नांगरणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी नांगरण्याचे काम सोपे व कमी खर्चात होत आहे. कारण जमीन नरम झाल्यामुळे ट्रॅक्टरने ऐकरी चार तास लागायचे तिथे तीन तासात काम होत आहे. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. परंतू पुढील बी,भरणासाठी लागणारा पैसा अडका जमवायचा कसा ही शेतकऱ्यांसाठी कसोटी ठरत आहे.

*दुष्काळाने पत गमावली करावे लागणार नगदी व्यवहार*
यावर्षी सुरुवात निराशाजनक झाली तर शेवट दुष्काळाने झाला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडे कृषि केंद्राच्या मागील उधाऱ्या देणे बाकी आहेत. कारण शेतमाल विकला की उधारी देवून टाकायची ही जुनी परंपराच आहे. परंतू यावर्षी उत्पादनच झाले नाही, तर उधारी द्यायची कोठून हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी दुष्काळाने आमची पत गमावली असल्याचे अनेक शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे यावर्षी नगदी व्यवहार करूनच खत,बी विकत घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया.
" रब्बीतील हरभऱ्याची दुबार पेरणी करुनही तो जमला नाही, हातात आलेले तुरीचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले. आणि खरिपातील एकरी तीन पोते झालेले सोयाबीन भाव नसल्यामुळे अजून घरातच आहे. त्यामुळे पैशाची जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे."
___ सुरज कुंडलिक गव्हाणे
( शेतकरी, पाचंबा ता.रिसोड )

5
1560 views